bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Kings 22
1 Kings 22
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
1
अरामी लोक व इस्राएल लोक ह्यांच्यामध्ये तीन वर्षे लढाई झाली नाही.
2
तिसर्या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाच्या राजाकडे आला.
3
तेव्हा इस्राएलाचा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “रामोथ-गिलाद आपलेच आहे हे तुम्हांला ठाऊक आहे काय? तर आपण स्वस्थ का राहावे? ते अरामाच्या राजापासून हिसकावून का घेऊ नये?”
4
तो यहोशाफाटास म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपलेच व माझे घोडे ते आपलेच.”
5
यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश विचारून घे.”
6
इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलादावर चढाई करून जाऊ का नको?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जा; प्रभू ते महाराजांच्या हाती देईल.”
7
तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्याच्याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू.”
8
इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “महाराजांनी असे बोलू नये.”
9
तेव्हा इस्राएलाच्या राजाने एका कारभार्यास बोलावून सांगितले, “लवकर जाऊन इम्लाचा पुत्र मीखाया ह्याला घेऊन ये.”
10
इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते.
11
तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”
12
सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणेच भाषण करू लागून म्हणाले, “रामोथ-गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो; कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
13
जो जासूद मीखायाला बोलवायला गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्ट्यांचे एकमत होऊन ते राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, तर त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.”
14
मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.”
15
तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हे मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर युद्ध करायला जावे की न जावे?” त्याने त्याला म्हटले, “जा, यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
16
राजा त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या नावाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे?”
17
मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले; तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”
18
इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “हा माझ्यासंबंधाने अनुकूल संदेश सांगणार नाही तर प्रतिकूल सांगेल असे मी आपल्याला सांगितले नाही काय?”
19
मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक: परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.
20
परमेश्वर म्हणाला, ‘अहाबाला असा कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले.
21
त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’
22
परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील; जा, तुझ्याकडून हे होईल; तसेच कर.’
23
तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.”
24
तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला, आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलायला कोठून गेला?”
25
मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”
26
मग इस्राएलाचा राजा म्हणाला, “नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश ह्यांच्याकडे मीखायाला माघारी घेऊन जा;
27
आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ह्या मनुष्याला बंदीत टाका, व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”
28
मीखाया म्हणाला, “तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्या द्वारे बोललाच नाही.” तो म्हणाला, “लोकहो, तुम्ही सर्व हे ऐका.”
29
नंतर इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट ह्यांनी रामोथ-गिलादावर चढाई केली.
30
इस्राएलाच्या राजाने यहोशाफाटाला सांगितले, “मी वेष बदलून लढाईला जाणार; पण आपण आपली स्वतःची वस्त्रे घाला.” ह्याप्रमाणे इस्राएलाचा राजा वेष बदलून लढाईला गेला.
31
अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा केली होती की, ‘लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.’
32
त्या रथाच्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा ते म्हणाले, “हाच इस्राएलाचा राजा आहे.” म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; तेव्हा यहोशाफाटाने आरोळी ठोकली.
33
रथाच्या सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पाठलाग करायचे सोडून ते परतले.
34
मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा.”
35
त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून उभा होता; तो संध्याकाळी मरण पावला; त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले.
36
सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की, “प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी.”
37
राजा मरण पावल्यावर त्याला शोमरोनाला नेले; शोमरोन येथे त्यांनी त्याला मूठमाती दिली.
38
राजाचा रथ शोमरोनाच्या तळ्यानजीक धुतला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले; ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती.
39
अहाबाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते, त्याने बांधलेले हस्तिदंती गृह, त्याने वसवलेली सर्व नगरे ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
40
अहाब आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, आणि त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
41
इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदावर राज्य करू लागला.
42
यहोशाफाट राज्य करू लागला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा; ती शिल्हीची कन्या.
43
त्याची सगळी चालचलणूक त्याचा पिता आसा ह्याच्याप्रमाणे होती; ती त्याने सोडली नाही; परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; तथापि त्याने उच्च स्थाने काढून टाकली नाहीत; लोक अजून त्या उच्च स्थानांवर यज्ञ करीत व धूप जाळीत.
44
यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाशी तह केला.
45
यहोशाफाटाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने दाखवलेला पराक्रम, त्याने केलेली युद्धे, ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
46
त्याचा पिता आसा ह्याच्या वेळी जे पुरुषगामी राहून गेले होते त्यांना त्याने देशातून घालवून दिले.
47
त्या काळी अदोमात कोणी राजा नव्हता; एक मुतालीक (कारभारी) राज्य चालवत होता.
48
सोने आणण्यासाठी ओफीर येथे जाता यावे म्हणून यहोशाफाटाने तार्शीशी गलबते बांधली; ती एसयोन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती गेली नाहीत.
49
तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्या यहोशाफाटाला म्हणाला, “माझे सेवक आपल्या सेवकांबरोबर जहाजातून जाऊ द्या;” पण यहोशफाटाने नकार दिला.
50
यहोशाफाट आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये, मूळ पुरुष दावीद ह्याच्या नगरामध्ये मूठमाती दिली; आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राजा झाला.
51
यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने इस्राएलावर दोन वर्षे राज्य केले.
52
परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, त्याच्या आईबापांच्या आणि इस्राएल लोकांच्या हातून पाप करवणारा नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या मार्गाने तो चालला.
53
आपल्या बापाप्रमाणे त्याने बआलाच्या मूर्तींचे भजनपूजन करून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले.
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22